श्री रामेश्वर मंदिर उत्सव

पोशाख कसा असावा ?

मंदिरात जाताना नेहमीच भारतीय पेहरावमध्ये, सभ्य पोशाख घालून जावे. तंग / उन्मादक / छोटे / बिनबाह्यांचे / अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करू नयेत.

पुरुषांचा पेहराव : शर्ट पँट, पायजमा / धोतर, कुडता, लेंगा – झब्बा, लुंगी, चुडीदार, सिरा यातील असावा.

स्त्रियांचा पेहराव : पाचवारी / नऊवारी साडी,बाह्या असलेला पंजाबी ड्रेस / सलवार कमीज / चुडीदार यातील असावा.

मंदिरात कसे यावे ?

मंदिरात नित्यनेमाने जावे. मंदिरात जाण्याची वेळ ठरलेली असावी. शक्यतो सकाळी स्नानसंध्या झाल्यावर मंदिरा जावे. मंदिराच्या आवारात आल्यावर, चपला / पादत्राणे ठेवण्यासाठी नेमून दिलेल्या जागेवर काढून ठेवावेत. आपला मोबाईल बंद करावा अथवा “सायलेंट” वर ठेवावा. हातपाय धुण्याची सोय केलेली असलेल्या जागेवर हातपाय धुवावेत, डोळ्याला पाणी लावावे व नंतर सभामंडपाच्या प्रवेश द्वारातून, मंदिरात प्रवेश करण्यास सिद्ध व्हावे. सभामंडपात प्रवेश करण्यासाठी पायऱ्या चढायच्या आधी पायरीला स्पर्श करून नमस्कार करावा.

मंदिरात आल्यावर सभामंडपातील घंटा सौम्य स्वरात वाजवावी, अतिशय लहान नाद होईल, जणू काही या घंटा नादाने आपण देवाला जागृत करीत आहोत असा भाव मनात ठेवून घंटा नाद करावा. घंटा नाद केल्यावर, त्यातून उठणाऱ्या नाद लहरींचा आनंद घेऊन, क्षण दोन क्षण तिथेच थांबुन , मग गाभाऱ्याच्या दिशेने पुढे व्हावे. सभामंडपा मधून नंदिच्या डाव्या अंगाने प्रदक्षिणेच्या परिक्रमेत प्रवेश करावा. श्री रामेश्वराच्या दर्शनापूर्वी नंदिच्या दोन्ही शिंगांना स्पर्श करून नंदीचे दर्शन घ्यावे.

श्री रामेश्वराचे दर्शन घेऊन झाल्यावर, प्रदक्षिणेच्या परिक्रमेमधून डाव्या बाजुने प्रदक्षिणा सुरू करावी. गर्भगृहाच्या भिंतीना बाहेरच्या बाजुने स्पर्श करत प्रदक्षिणा घालू नये, प्रदक्षिणेच्या परिक्रमेतून मध्यम गतीने चालत प्रदक्षिणा घालावी. मनातल्या मनात ईश्वर नामाचा जप करत वा मनातल्या मनात स्तोत्र म्हणत, हात जोडलेल्या अवस्थेत प्रदक्षिणा घालावी. आपल्या आवाजामुळे दुसऱ्या भाविकांच्या एकाग्रतेचा भंग होणार नाही याची खबरदारी प्रत्येक भक्ताने घेणे अपेक्षित आहे. प्रदक्षिणा घालताना ईश्वराच्या पाठीमागे थांबुन नमस्कार करावा, नंतर तीर्थ प्रवाहित होते तिथपयंत जाऊन पाठी फिरावे, नंतर देवा समोरून येऊन उरलेल्या एक चतुथांश भागातील प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तीर्थ प्रवाहित होते, तिथुन पाठी फिरावे आणि देवासमोर येऊन उभे राहिल्यावर एक प्रदक्षिणा पूर्ण होते. देवासाठी सम संख्येत आणि देवी साठी विषम संख्येत प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे, परंतु श्री रामेश्वर मंदिरात असे कोणतीही पद्धत असल्याचे ऐकिवात नाही. प्रदक्षिणा घालून होताच, सभामंडपात येऊन देवाला नमस्कार करावा. नंदि, कासव , श्री रामेश्वर यांच्या सरळ रेषेत, परिक्रमा क्षेत्रात उभे राहून नमस्कार करू नये, त्यामुळे इतर भक्तगणांच्या दृष्टी रेषेत तुम्ही येऊ शकता.

तीर्थ प्राशन करण्यासाठी तुमच्या उजव्या हाताच्या तळव्याच्या मध्यभागी तीर्थ घ्यावे, प्रथम प्यावे आणि ओल्या तळव्याचा स्पर्श प्रथम डोळ्यांना आणि नंतर मस्तकाला करावा. तीर्थ प्राशन करून मगच देवळातून निघावे. मंदिरातून निघायच्या आधी थोडावेळ का होईना एकाग्र चित्ताने, डोळे मिटून स्वस्थ बसावे, जेणे करून मंदिरातील सकारात्मक उर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करेल.

मंदिरातून बाहेर पडताना एकदा देवाला नमस्कार करून “तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर राहू देत” असे म्हणून प्रार्थना करावी. देवळातून बाहेर आल्यावर, मंदिराच्या कळसाला अवश्य नमस्कार करावा.

विशेष सूचना :

• प्रदक्षिणा मध्यम गतीने चालत घालावी. काम आटपायचे आहे म्हणून घाईगर्दीत प्रदक्षिणा घालू नये.

• मित्रमैत्रिणी बरोबर मोबाईलवर बोलत, आपसात गप्पा मारत प्रदक्षिणा घालू नये.

• प्रदक्षिणेच्या परिक्रमेत मधेच उभे राहू नये.

• सभामंडपात गप्पा मारत बसू नये, देवळात शांतता राखावी.

विश्वस्त मंडळ
श्री रामेश्वर मंदिर संस्थान