दिनांक ०९ मार्च २०२५ (फाल्गुन शुध्द दशमी शके १९४७) रोजी श्री रामेश्वर मंदिराने शंभराव्या वर्षात पदार्पण केले. मंदिराचा ९९वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. दोन दिवसीय श्री गणेश यागाचा समारोप दुपारी पार पडला.
संध्याकाळी परंपरेनुसार श्री रामेश्वराचा संपूर्ण सरस्वती बाग परिसरातून लालखी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. झेंडे नाचवणाऱ्या ढोल ताशा पथकामुळे वातावरणामध्ये जल्लोष भरून गेला. ह्या पथकाला भजनी मंडळाने खूप छान साथ दिली. ह्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री सतीश थवी यांनी लालखीच्या मार्गामध्ये आणि सर्व इमारतींच्या प्रवेशद्वारामध्ये काढलेल्या मनोहारी रांगोळ्या. स्थानिक रहिवासी आणि भक्तगण मोठ्या संख्येने लालखी सोहळ्यामध्ये आणि त्या नंतरच्या श्री रामेश्वराच्या आरतीमध्ये सामील झाले. आरतीवेळी श्री रामेश्वर मंदिर भक्तांनी भरून गेले होते. आरतीपश्चात सर्वाना प्रसाद आणि अल्पोपहार वाटप करण्यात आले. लालखी सोहळ्यादरम्यान स्थानिक खासदार श्री. रवींद्र वायकर यांनी आवर्जून उपस्थित राहून श्री. रामेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले आणि सोहळ्याची शान वाढवली.

