महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी, श्री रामेश्वर मंदिराच्या नव्या वेबसाईटचे अनावरण ज्येष्ठ संगीतकार श्री अशोक पत्की यांच्या हस्ते संपन्न झाले.
श्री पत्की यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रारंभी उपस्थित राहणे कठीण वाटत होते, मात्र मंदिराशी असलेली त्यांची श्रद्धा व जिव्हाळा लक्षात घेता त्यांनी तत्परतेने सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत त्यांच्या सौभाग्यवतींचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमामध्ये भाषण न करण्याची त्यांची अट असूनही प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी तबला, हार्मोनियम आणि विविध वाद्यांच्या सुरावटींनी सजलेल्या संगीतमय वातावरणात ते भारावून गेले. वेबसाईटचे उद्घाटन केल्यानंतर श्री पत्की यांनी स्वतः संगीतबद्ध केलेली अनेक गीते आणि प्रसिद्ध दूरदर्शन मालिकांची शीर्षक गीते सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुमधुर सादरीकरणास प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री पत्की यांनी आगामी शतक महोत्सवी वर्षात पुन्हा उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली.
संपूर्ण कार्यक्रमात भक्ती, संस्कृती आणि संगीताचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला.
एकूणच, श्री रामेश्वर मंदिराच्या शतकमहोत्सवाच्या उंबरठ्यावर आयोजित हा समारंभ अत्यंत संस्मरणीय ठरला.
